पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ लाख ८१ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्यास चंदननगर पोलिसांनी गुजरातमधील मेहसाणा येथून अटक केली. प्रवीणभाई चौहान (वय २२, रा. गोरिसाणा, ता. खेरालु, जि. मेहसाणा) असे त्याचे नाव आहे.
फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला नफा मिळवून दिला. त्यावरुन त्यांना विश्वास बसल्याने त्यांच्याकडून २२ लाख ८१ हजार रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी घेऊन त्यांची फसवणूक केली. याची तक्रार मिळाल्यावर चंदननगर पोलिस ठाण्यातील सायबर कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, हवालदार भरत उकिरडे, संतोष शिंदे यांनी बँक खात्याचा तपशील व मोबाईल लोकेशन घेतल्यावर तो मेहसाणा येथील असल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने तेथे जाऊन प्रवीणभाई चौहान याला पकडले. त्याचे मित्रही यात सहभागी असल्याचे समजल्यावर त्यांचा शोध घेतला. पोलिस आल्याचे समजल्यावर ते पळून गेले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, हवालदार भरत उकिरडे, अंमलदार संतोष शिंदे, महिला अंमलदार मेमाणे, डहाळे यांनी केली.
फसवणुकीसाठी कॉल सेंटर
चौहान व त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक राज्यातील नागरिकांना अशा प्रकारे कोट्यवधींना गंडा घातला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, या सायबर चोरट्यांच्या शोधासाठी अनेक राज्यातील पोलिस पथके प्रयत्न करत होते. अनेक वेळा ड्रोन कॅमेराच्या माध्यमाने त्यांचा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणालाही ते मिळाले नव्हते. चंदननगर पोलिसांनी त्यांच्या व्यवहाराची सर्व माहिती बारकाईने गोळा केली. त्यावरुन त्याला पकडले. लोकांना कॉल करण्यासाठी त्यांनी कॉल सेंटरच उघडले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्रयस्थ लोकांकडून सीम कार्ड घेऊन दुसऱ्याच्या नावाने बँकेत खाते उघडत. स्वत:च्या नावाचे सीम कार्ड, बँक खात्याचा वापर करीत नव्हते. काही दिवसांनी ते सातत्याने जागा बदलत असत. फसवणुकीमधून मिळालेल्या पैशांतून महागड्या वस्तू, गाड्या व पिकनिकच्या ठिकाणी मौजमजा करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.