पुणे : वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात राहणाऱ्या सुशील सुहास गावठाणकर (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ९ ऑगस्ट २०२३ रोजी घडला. तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला. वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास त्याचा चांगला परतावा मिळेल असे सांगितले. काम करण्यास होकार दिल्याने त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. सुरुवातीला मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यांनतर वेगवेगळी कारणे सांगत तब्बल २१ लाख ८९ हजार रुपये उकळले.
काही कालावधी उलटल्यानंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने विचारपूस केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ०3) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहेत.