विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामाच्या गडबडीत, विचारामध्ये अनेक जण हातातील मोबाईल एखाद्या ठिकाणी ठेवतात. त्यांच्याकडून असे मोबाईल हरविले जातात. गेल्या वर्षभरात पुणे शहरात तब्बल २२ हजार ९४३ मोबाईल हरविल्याची नोंद शहर पोलिसांकडे नोंदविली गेली आहे. या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यापैकी तब्बल ९०० मोबाईल हे पुण्यात ॲक्टिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हे हरविलेले मोबाईल वापरणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यापैकी ३५ मोबाईलधारकांना शोधण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
मोबाईल हरविल्यास नवीन सीमकार्ड घेण्यासाठी मोबाईलधारकाला हरविल्याची तक्रार आवश्यक असते. त्यासाठी पुणे पोलिसांनी वेबसाईटवर लॉस्ट ॲन्ड फाऊंड ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर तुम्ही तक्रार करताच तुम्हाला ऑनलाईन तक्रार केल्याची कॉपी मिळते. याचा उपयोग करून तुम्ही त्याच मोबाईल नंबरचे सीमकार्ड घेऊ शकता. या सुविधेमुळे अनेकदा मोबाईल चोरीला गेला तरी त्याची नोंद पोलीस लॉस्ट ॲन्ड फाऊंडवर करायला सांगतात.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात मोबाईल हरविल्याच्या २२ हजार ९४३ तक्रारींची नोंद झाली होती. या मोबाईलचे टेक्निकल ॲनालिसेस सेलमार्फत विश्लेषण करण्यात आले. तेव्हा त्यातील ९०० मोबाईल हे पुण्यात ॲक्विव्ह असल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या पाचही युनिटला ही माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून शोध घेण्यात येत आहे. त्यात परिमंडळ १ कडून ५ मोबाईल, परिमंडळ २कडून ५, परिमंडळ ३ कडून ४, परिमंडळ ४ कडून ८ आणि परिमंडळ ५ कडून २० असे ३५ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे. या सर्वांना हे मोबाईल हँडसेट वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस आढळून आले होते. हस्तगत केलेले मोबाईल हँडसेट मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
..
तक्रार केली अन् घरातच सापडला मोबाईल
ज्या ठिकाणी हरविलेला मोबाईल ॲक्टिव्ह होता त्याचा शोध घेत पोलीस एका ठिकाणी पोहोचले. मोबाईलधारकाला त्याच्याकडील मोबाईलविषयी विचारून हा हरविल्याची तक्रार झाली होती. तो तुमच्याकडे कसा आला, याची चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा त्या तरुणाने दिलेले उत्तर ऐकून पोलीसच चक्रावले. या तरुणाने मोबाईल हरविल्याची तक्रार लॉस्ट ॲन्ड फाउंडवर दिल्यानंतर त्याचा मोबाईल त्याला घरातच सापडला होता. पण त्याने आपली तक्रार मागे घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी हरविलेला मोबाईल ॲक्टिव्ह असल्याचे पाहून मोबाईलधारकाचेच घर गाठले होते.
......
अन्य राज्यातही ॲक्टिव्ह
पुण्यात हरविलेले असंख्य मोबाईल हे उत्तर प्रदेश, कर्नाटक व अन्य राज्यात ॲक्टिव्ह असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण सेलला आढळून आले आहे.
.....
लॉस्ट अँड फाउंडमध्ये गेल्या वर्षभरात (२०२०) मध्ये एकूण २२९४३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी दाखल
..........
२०२० च्या प्रत्येक महिन्यात दाखल तक्रारी
जानेवारी - ३२८२
फेब्रुवारी - २९१४
मार्च - २२०६
एप्रिल - ६२०
मे - १०७९
जून - ११३६
जुलै - १४१७
ऑगस्ट - १८९५
सप्टेंबर - १७५७
ऑक्टोबर - २३१९
नोव्हेंबर - २२६९
डिसेंबर - २०४९
......
जानेवारी २०२१ या महिन्यात सर्वाधिक एकूण ३२८२ तक्रारी आहेत.