बावडा : जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या १ आणि २ उपविभागीय कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित केला आहे. त्यानुसार पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील २२ गावांची होरपळ अधिक वाढणार आहे. शासन निर्णयात २२ गावांच्या हक्काचे पाणी कसे देणार, याचा समावेश करा, मगच आदेश लागू करा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केली. हा निर्णय दि. २१ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला असल्याने इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणारा आहे. शासनाने असा आदेश काढल्याने या गावांचे शेतीचे पाणी गुल होणार आहे. नीरा डाव्या कालव्यावरील अधिपत्याखाली असणारे २२ गावचे क्षेत्र थेट चासकमान प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचा घाट यामुळे सुरू झाला आहे. एकाच फाट्यावर दोन वेगळी यंत्रणा असणार आहे. यामध्ये अंथुर्णे शाखा एकच्या वरचा संपूर्ण भाग कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभागाकडे ठेवला आहे. २२ गावांचा सर्वच भाग चासकमानकडे वळवला आहे. एकतर पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत हे कार्यक्षेत्र असतानादेखील २२ गावच्या शेतीला पाणी न मिळाल्याने या गावांवर अन्याय झाला आहे. समान पाणीवाटप कायदा सन २००५ नुसार ‘टेल टू हेड’ पाणी समान हक्क पद्धतीने देण्याचे धोरण असताना गेल्या दोन-तीन वर्षांत पाटबंधारे विभागाकडून अत्यल्प पाणी देण्यात आले. मात्र, शेळगाव पासूनवर असणारे मोठे उसाचे क्षेत्र याला जादा पाणी देऊन या २२ गावांवर अन्याय केला आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ व श्रीमंत ढोले यांनी केला आहे. नव्या निर्णयामुळे २२ गावांचा भाग पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे येत नाहीत. त्यामुळे वीर, भाटघरचे पाणी मिळणे अशक्य होणार आहे.
इंदापुरातील २२ गावांच्या तोंडचे पाणी पळणार !
By admin | Published: October 24, 2016 1:21 AM