कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही शासनाने पायी वारीला परवानगी दिलेली नाही. परंतु काही विठ्ठलभक्त वारक-यांनी पायी वारीचा आग्रह धरला आहे. त्यानुसार काही वैष्णवांनी पंढरीकडे पायी मार्गक्रमण सुरू केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वारकरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतून पायी पंढरपूरकडे निघाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस ठाण्याचे हद्दीत गस्त वाढवण्यात आली होती. आज सकाळी काही वारकरी पुणे - सासवड राज्यमार्गावरून पंढरपूरकडे निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस वडकी गावच्या हद्दीतील १० वा मैल येथे २२ जण नाष्टा करत असताना आढळून आले.
त्या सर्वांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशीत त्यांनी ते पुणे, पिंपरी चिंचवडसह, जळगाव, बुलडाणा, अकोले, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. आम्हाला अटक केली तरी चालेल आम्ही परंपरेनुसार कोरोनाचे नियम पायदळी न तुडवता पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारच, असे त्यांनी पोलिसांंना सांगितले. पोलिसांनी त्यांना कोरोना संदर्भात शासनाचे नियम समजावून सांगितलेे. त्यानंतर त्यांनी आम्ही घरी जातो असे लेखी दिलेनंतर समन्सपत्र देवून त्यांना सोडून देण्यात आले.