पुणे : वडिलांचे नाव घेऊन पैसे पाठविल्याचे खोटे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार हा प्रकार १८ जानेवारी रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. खोटी ओळख सांगून सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांचे नाव घेत पैसे पाठवायला सांगितले. तरुणीचा विश्वास बसल्याने सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे १८ हजार रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.