- विशाल विकारी
लोणावळा (पुणे) : घाटमाथ्यावरील पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरात मंगळवारी (१८ जुलै) २४ तासांत २२० मिमी (८.६६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने पुढील तीन- चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात तब्बल ४३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणामध्ये आज सकाळपर्यंत ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.
लोणावळा शहरात जून महिन्यांपासून आजपर्यंत १७४४ मिलिमीटर (६८.६६ इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत २५९२ मिलिमीटर (१०२.०५ इंच) पाऊस झाला होता. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. शहानी रोड, बस स्थानकाच्या बाहेरील रस्ता, बाजारातील रस्ते, रायवूड भागातील रस्ते, नांगरगाव वलवण रस्त्यावर पाणी साचले आहे.
भोंडे हायस्कूलच्या गेटसमोरील दोन्ही रस्त्यांवर पाणी भरल्याने मुलांना पाण्यातून शाळेत जावे लागत आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे सातू हाॅटेलसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यासोबतच खंडाळ्यातील पोस्ट कार्यालयाच्या मागील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सकल भागातील देखील पाणी साचण्याची शक्यता आहे.
मावळातील सर्व धरणाचा पाणीसाठा
मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणामध्ये आज सकाळपर्यंत ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर नाणे मावळामधील आंध्रा धरणामध्ये ४९ टक्के वडवळे धरणामध्ये ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणात ३२.१९ टक्के, टाटा कंपनीच्या ठोकळवाडी धरणात ४३.०२ टक्के, शिरोटा धरणात ४०.७७ टक्के, वलवण धरणात ४२.९४ टक्के, लोणावळा धरणात ४८.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.