पुणे : शंभरपेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी महापालिकांच्या २२२ शाळांना कला, क्रीडा व कार्यानुभवाच्या शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.२०११-१२ रोजी सर्वशिक्षा अभियानांतर्गत या शिक्षकांच्या १०० पटापेक्षा जास्त शाळांमध्ये मानधन तत्त्वावर नेमणुका केल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात काही कारणास्तव त्या नेमणुका रद्द करण्यात आल्या होत्या. यांतील काही शिक्षक कायम करा, या मागणीसाठी न्यायालयातही गेले होते. यावर न्यायालयानेही ९ मे २०१४ रोजी या शिक्षकांची खंड पडू न देता ३ वर्षे सलग नियुक्ती करा, असे आदेश दिले होते. मात्र, दरम्यानच्या काळात शासनस्तरावर कार्यवाही करण्यास वेळ लागल्याने त्यांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाने यासाठी पाठपुरावा केल्यानंतर २६ फेबु्रवारी रोजी शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदांना पत्र पाठवून पूर्वीच्या शिक्षकांना प्राधान्य देऊन नेमणुका करून माहिती पाठवून द्या, असे आदेश दिले होते. मात्र, नियुक्त्या रखडल्या होत्या. बुधवारी शिक्षण सभापती शुक्राचार्य वांजळे, बांधकाम सभापती मंगलदास बांदल व शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख, शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोहिते-पाटील यांनी या शिक्षकांसमवेत पत्रकार परिषद घेऊन नियुक्त्या देत असल्याचे जाहीर केले. शालेय व्यवस्थापन समितीतर्फे तासिका तत्त्वावर हे शिक्षक काम करणार असून, या वर्षीच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद नसल्याने पुढील महिनाभरासाठी ते कोणतेही मानधन न घेता काम करणार आहेत. आमच्या रखडलेल्या नियुक्या केल्या आहेत. आम्ही प्रामाणिकपणे काम करू, अशा शब्दांत या वेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोहिते-पाटील व महिला जिल्हाध्यक्षा अंकिता शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)पुणे, पिंपरी महापालिका व जिल्हा परिषद शाळांतील सहावी, सातवी व आठवीच्या १०० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या २२२ शाळांत ६६६ शिक्षकांना या नियुक्तीमुळे संधी मिळणार आहे.
२२२ शाळांना मिळणार कला, क्रीडा शिक्षक!
By admin | Published: April 14, 2016 2:06 AM