पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी परिसरातील विविध विकास कामांसाठी २३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. प्रस्तावित विकास कामांपैकी काही कामे प्रगतीत असून काही कामे निविदा प्रक्रियास्तरावर आहेत, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात दिली.
विधिमंडळ अधिवेशनात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या विकास कामांसाठी २३ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये श्री शिवजयंतीच्या निमित्त केली होती. कोरोनामुळे आर्थिक संकट असतानाही या प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून निधीला कात्री लावण्यात आलेली नाही.
प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२०-२१ अंतर्गत पर्यटन विभागाने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी शासन निर्णय काढला. त्यानुसार शिवनेरी किल्ला विकास कामांसाठी २३ कोटी ४९ लाख एवढ्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा निधी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरित करण्यात आला आहे. प्रस्तावित विकास कामांपैकी काही कामे प्रगतिपथावर असून, काही कामे निविदा प्रक्रियास्तरावर आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.