पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़ सर्वसाधारणपणे दरवर्षी १ आॅक्टोबरला मॉन्सून राज्यातून माघारी जात असतो़ यंदा त्याला तब्बल २३ दिवस उशीर झाला आहे़ येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता असून २६ आॅक्टोबरला तो द्वीपसमुहातूनही माघारी परण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ साधारण दरवर्षी मॉन्सूनच्या परतीस पश्चिम राजस्थानमधून १ सप्टेंबरच्या सुमारास सुरुवात होते़ यंदा मॉन्सूनला सर्वाधिक काळ रेंगाळला असून गेल्या ७ वर्षात सर्वात उशिरा मॉन्सूनची माघारी जाण्यास सुरुवात झाली होती़ मॉन्सूनची माघारी सुरु झाली हे जाहीर करताना हवामान विभाग काही निकष पडताळून पहाते़ त्यात सलग ५ दिवस त्या त्या क्षेत्रातील पावसाचे कमी होत गेलेले प्रमाण, हवेतील आर्द्रता कमी होत जाते़ त्यानंतर त्या भागातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे समजले जाते़ गेल्या काही दिवसात राज्यात अपवाद वगळता पाऊस झाला नाही़ तसेच आर्द्रता कमी होत गेली असून उष्मा वाढला आहे़ मंगळवारी मॉन्सूनची माघारीची रेषा कलिंगापट्टम, मेडक, बिजापूर, गोवा अशी आहे़ येत्या २४ तासात मॉन्सूनचे संपूर्ण देशभरातून माघारी परतण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५ टक्के पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण असमान होते़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी झालेल्या पावसामुळे हे असमान वितरण झाले असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे़ विशेषत: उत्तर भारतातील अनेक विभागात यंदा कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर विदर्भात सप्टेंबर अखेर सरासरीपेक्षा तब्बल २३ टक्के पाऊस कमी होता़ त्यानंतरही १ ते २३ आॅक्टोंबर दरम्यान विदर्भातील ५ जिल्ह्यात कमी पाऊस पडला आहे़ नांदेडमध्येही कमी पाऊस झाला आहे़ परतीचा पाऊसही माघारी गेल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील धरणातील पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात तेथे पाणी संकट उद्भवण्याची शक्यता आहे़
तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:31 PM
नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़.
ठळक मुद्देसंपूर्ण देशातून येत्या २४ तासात मॉन्सून माघारी जाण्याचे संकेत२६ आॅक्टोबरपर्यंत द्वीपसमुहातूनही तो माघारी परतेल़