पुणे : देशात मान्सूनचा कालावधी संपला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदविला गेला असून, इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. आता परतीचा पाऊस काही दिलासा देऊ शकतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जून-जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यांमध्येही पावसाने निराशाच केली. आता सप्टेंबर महिनाअखेर काही प्रमाणात राज्यात पाऊस झाला. विदर्भासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
सर्वांत कमी पाऊस कुठे?
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत आणि अकोला, अमरावतीमध्येही कमी पावसाची नोंद आहे.
पुढील दिवसांत काय?
अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पूर्व ईशान्याकडे सरकण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधारची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ४ ऑक्टोबरनंतर उत्तर भागातील मान्सून परतेल. उद्या (दि. १) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील.