पुणे : शेअर्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगत २३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय हणमंतराव सुंकड (५७, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ नोव्हेंबर २०२३ पासून ६ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन राधिका शर्मा बोलत असल्याचे सांगितले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका व्हाट्सअप ग्रुपवर ऍड करून शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल असे सांगितले. अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर त्यातून शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने वेगवगेळी कारणे सांगून २३ लाख ५० हजार रुपये स्वतःच्या उकळले. त्यांनतर त्यांच्या शेअर्स सिक्युरिटीच्या पोर्ट-फोलिओमध्ये बनावट जमा रक्कम दाखवून ती खरी असल्याचे भासवले. मात्र त्यांनतर सुंकड यांना संशयास्पद वाटल्याने, त्यांनी यासंदर्भात खातरजमा केली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमाने हे करत आहेत.