गेल्या आठवड्यात साकुर्डे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकदम २० वर गेली होती. यातच एक रुग्ण दगावल्याने ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १२९ जनांचीच अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात तब्बल २४ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सरपंच रमेश सदाशिव सस्ते यांनी केली आहे.
त्याच बरोबर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने गावातील ३०० कुटुंबांना प्रत्येकी चार मास्क आणि सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप केले आहे. बेलसर प्राथमिक उपचार केंद्रात रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या गोळ्यांचा तुटवडा असल्याने त्यांनी बाधित रुग्णांना मेडिकल किट ही स्वखर्चाने दिले आहे.
प्रशासनाने ताबडतोब गावातील संपूर्ण कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी तसेच संपर्कातील लोकांना विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था करावी. ग्रामपंचायत आणि आपण स्वखर्चाने सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन ही त्यांनी दिले आहे.
सर्वेक्षणासाठी साकुर्डे उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी पौर्णिमा पांडव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अक्षदा दळवी, आरोग्य सहायिका सुनीता कोरे, आरोग्य सेविका सत्यभामा म्हेत्रे, आशा स्वयंसेविका वनिता लोंढे, आरोग्य अर्धवेळ परिचारिका आशा भंडलकर यांनी बेलसर प्रथमोपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भरत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचण्या केल्या. यावेळी सरपंच रमेश सस्ते, ग्रामसेवक संजय भोसले, पोलीस पाटील प्रियांका चव्हाण आदींनी सहकार्य केले.
साकुर्डे येथे अँटिजेन नमुने तपासताना.