सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरीब, सर्वसामान्य नागरिकांसह भल्याभल्यांना सात-बारा उताऱ्यात कधी नजरचुकीने तर कधी जाणीवपूर्वक होणाऱ्या चुका वर्षानुवर्षे तापदायक ठरतात. या चुका दुरुस्त करण्याची खास तरतूद कायद्यात असतानादेखील महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘अर्थपूर्ण व्यवहार’ झाल्यावर मात्र ठराविक लोकांचे सातबारे दुरुस्त केले जातात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी खास मोहीम घेऊन मोठ्या प्रमाणात सातबारा दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार सातबारे दुरुस्त झाले असून, केवळ १५ हजार ७८८ सातबाऱ्यांची दुरुस्ती शिल्लक राहिली आहेत.
राज्यात सातबारा उतारा हा आजही मालमत्तेचा भक्कम पुरावा मानला जातो. याच सातबारा उताऱ्यात काही चुका असतील तर संबंधितांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. सातबारा उतारा किंवा तत्सम मालमत्तापत्रकांतील चुका दुरुस्तीची कायदेशीर तरतूद असतानाही त्या दुरुस्त्यांसाठी महसूल कर्मचारी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा सामान्यांचा अनुभव आहे. जमिनीची किंमत किती याचा हिशेब करून दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास संबंधित कामे प्रलंबित ठेवणे असे प्रकार सर्रास होतात. महसूल खात्यातील काही जणांच्या खाबुगिरीला वेसण बसताना दिसत आहे.
यामुळेच गेल्या वर्षी जिल्ह्यात ३९ हजार ६२१ सातबारे दुरुस्तीसाठी महसूल प्रशासनाकडे प्रलंबित होते. जिल्हाधिकारी देशमुख यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ प्रमाणे सातबारा उतारा किंवा ‘सिटी सर्व्हे रेकॉर्ड’मध्ये होणाऱ्या चुका दुरुस्तीसाठी खास मोहीम घेतली. यामुळेच गेल्या वर्षभरात सुमारे २३ हजार ८३३ सातबारे उतारे दुरुस्त करण्यात आले.
चौकट
सातबाऱ्यांच्या १५५ च्या दुरुस्तीकडे होते दुर्लक्ष
“प्रशासनाकडून नजरचुकीने अथवा जाणीवपूर्वक झालेल्या चुका महसूल कायद्याच्या कलम १५५ नुसार दुुरुस्त करण्याचे अधिकार असतात. सामान्य नागरिकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी विशेष मोहीम घेऊन या दुरुस्त्या करण्यात आल्या. आता जिल्ह्यात केवळ साडेपंधरा हजार सातबाऱ्यांची दुरुस्ती शिल्लक आहे.”
-डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
चौकट
तालुकानिहाय दुरुस्तीसाठी शिल्लक सातबारे
हवेली - ५ हजार ३३
पुणे शहर - ७८७
शिरूर - ८८२
मावळ - ११७७
मुळशी - १४०७
खेड - ८३२
बारामती - १३२१
इंदापूर - १६९३
दौंड - ११३०
पुरंदर - ११९०
भोर - ८६४
वेल्हा - ८०
जुन्नर - ३५
आंबेगाव - ६६
एकूण - १५७८८
-------