पुणे: जादुटोण्यासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीसह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केल्यानंतर आता तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.
मौलाना शोएब मैनुद्दीन आत्तार (वय ३७, रा. मस्जिद मोहल्ला बोपोडी) असे या मौलानाचे नाव आहे. यापूर्वी अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व रोया ऊर्फ सीमा अब्दुल हुसेन नईम आबादी (वय ३५, रा. कॅम्प) यांना अटक केली होती. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मौलाना शोएब व नादीर यांनी इतरांशी संगनमत करून इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. या प्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
समर्थ पोलिसांनी मौलाना शोएब आत्तार याने गुन्ह्यातील फसवणुकीच्या रकमेतून जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी केली असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास करून ती जप्त करायची आहे. शोएब आत्तार याने गुंतवणूकदार नसलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर रकमा ट्रान्सफर केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सखोल तपास करायचा असल्याचे पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने मौलाना शोएब आत्तार याला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.