जुन्नर (पुणे) : तालुक्यातील गोद्रे येथे जोरदार वादळी वाऱ्यात विजेची ठिणगी पडून घराला आणि गोठ्याला लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील भिमाजी रेंगडे यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. भिमाजी रेंगडे यांच्या घराशेजारील गवतावर विजेची ठिणगी पडल्याने आग लागली असल्याचे समजते. जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि घराला आग लागली. घरात असलेल्या भीमा बुधा रेंगडे व त्यांच्या पत्नी फसाबई यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली व घराशेजारी असलेल्या गोठ्यासदेखील आग लागली. घर आणि गोठ्यात जनावरे होती. आगीच्या तीव्रतेमुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. परिणामी आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला.
आगीच्या झळा बसल्याने भिमाजी रेंगडे आणि फसाबई रेंगडे हे देखील भाजले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे असून घरातील चीज वस्तूंबरोबरच अन्न धान्यांचा साठादेखील जळून खाक झाला आहे.