मांजरी : रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी मांजरी बुद्रूक रेल्वेगेट ते गोपाळपट्टी येथील परिसरात मंगळवारपासून बुधवारपर्यंतच्या केलेल्या कारवाईत २५ सदनिकांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
येथील नागरिकांचा रोष व संताप पाहून माजी आमदार महादेव बाबर यांनी भेट घेऊन केलेल्या कारवाईची वस्तुस्थिती पाहिली. अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागले. काहींची दुकाने पाडली गेली. करण्यात आलेल्या कारवाईचा, प्रशासनाचा नागरिकांकडून तीव्र निषेध करण्यात आला. घरात लहान मुलेबाळे असताना, त्याचबरोबर किराणा दुकानात सामान असताना देखील ते काढू दिले नाही, असा संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नागरिक पुरते हडबडून गेले आहे. कारण बरेच जण गाफील होते.रस्ता रुंदीकरणासाठी आमचा विरोध नसून त्यांच्या सिस्टीमला आमचा विरोध आहे. कारण कारवाई करताना जागामालकांना अगोदर नोटिसा देऊन कळवणे. तसेच घरातील साहित्य काढण्यास मुदत देणे असे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्ष मांजरीत आल्यावर पाहणीदरम्यान समजले की अशा प्रकारची कोणतीही मदत प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक आहे. मिळकतदारांना पूर्वकल्पना न देता चुकीच्या पद्धतीने व सूडबुद्धीने केली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे. - महादेव बाबर, माजी आमदारमिळकतदारांना यापूर्वी नोटिसा पाठवल्या होत्या व चार महिन्यांपूर्वी तोंडीही सांगण्यात आले होते. त्याचबरोबर ९० ते ९५ टक्के मिळकतदारांनी यापूर्वीच मोबदला घेतला आहे. ठरावीक मिळकतदारांनी त्या वेळी मोबदला स्वीकारला नाही. परंतु त्यांचा मोबदला त्या वेळीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्यांनी त्या वेळी मोबदला स्वीकारला नाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पाठपुरावा करून मोबदल्याचा धनादेश घ्यावा. आणि पूर्वीच्या मिळकतींना ज्याप्रमाणे मोबदला मिळाला, त्याप्रमाणेच राहिलेल्या मिळकतदारांना मोबदला मिळेल. कोणालाही वाढीव मोबदला मिळणार नाही.- नकुल रणसिंग, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग