मागील आठवड्यात प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी अपंग व्यक्तींच्या विविध प्रश्नांबाबत पंचायत समिती मध्ये सहकार्यांसमवेत आंदोलन केले होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले होते. तसेच त्याच ठिकाणी शासकीय बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आज सोमवार दि. ८ रोजी पंचायत समितीमध्ये आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार, सभापती नलिनी लोळे, सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, गटविकास अधिकारी अमर माने, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, समाज कल्याण विभागांचे विस्तार अधिकारी सुहास कांबळे, तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार यांनी सांगितले की, पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिपच्या बैठकीला उपस्थित राहून आढावा सादर करावा. तालुका पातळीवर जे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांची तातडीने छाननी करावी, स्थळ पाहणी करून त्याप्रमाणे सर्व प्रस्ताव तातडीने मंजुरीला पाठवून द्यावेत.
प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी सांगितले की, प्रशासन अपंगांचे प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवते, त्यामुळे अपंगाना योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे २०१८ पासूनच्या सर्व प्रस्तावांची तातडीने दखल घ्यावी, नामंजूर प्रस्ताव, मंजूर प्रस्ताव, प्रगतिपथावरील कामे, प्रलंबित कामे यांची वर्गवारी करून तातडीने पूर्ण करावेत .
आमदार संजय जगताप यांनी यावेळी पंचायत समिती स्तरावर एक समिती स्थापन करावी, यामध्ये सभापती. गटविकास अधिकारी, सत्ताधारी आणि विरोधी गटाचा प्रत्येकी एक सदस्य, विस्तार अधिकारी यांची समिती बनवावी. प्रत्येक महिन्याच्या मासिक सभेच्या दुसऱ्या दिवशी या समितीची बैठक होऊन यामध्ये महिनाभराचा कामाचा आढावा होईल आणि तो आढावा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवावा अशा सूचना केल्या.
समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार यांनी सांगितले की, आगामी काही दिवसांत घरकुल योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वाना समान न्याय द्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळाला आहे, त्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे दोन्हीपैकी एकच लाभ मिळेल. यासाठी पुढील प्रस्ताव पाठविताना संबंधित लाभार्थ्यांना याबाबत सूचना द्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार संजय जगताप. यावेळी प्रवीण कोरघंटीवार, नलिनी लोळे, अमर माने आणि उपस्थित पदाधिकारी.