पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाकडे चौकशी प्रकरणात तडजोड करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या नावाने २५ लाख रुपये मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाची गुन्हे शाखेमधून पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडीओ चित्रीकरण केलेली सीडीच पोलीस आयुक्तांना संबंधितांनी सादर केली आहे.धनंजय धुमाळ असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध संदीप सुधीर जाधव (रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. जाधव आणि त्यांचे सहकारी हेमंत गांधी यांना संजय कचरदास मुथ्था यांनी स. नं. ९० येथील १५ गुंठे जमीन देण्याचे मान्य केले होते. तसा समजुतीचा करारनामा करण्यात आल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. या व्यवहारापोटी मुथ्था यांनी ८० लाख रुपये घेऊन कुलमुखत्यारपत्र करून दिले. या जागेसंदर्भात संजय पंढरीनाथ वाघमारे आणि राजेंद्र दत्तोबा चांदेरे यांनी मुथ्था, जाधव व गांधी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी दावे दाखल केले. ते दावे सध्या प्रलंबित आहेत. हा वाद मिटवत नसल्यामुळे गांधी यांनी मुथ्था यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर मुथ्था यांनी चांदेरे आणि गांधी यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्याकडे चौकशी देण्यात आली. जाधव यांना वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. २० जुलै रोजी परत बोलावल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती घालत यातून मोकळे व्हायचे असल्यास पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत प्रकरण मिटल्यावर आपल्याला काय द्यायचे ते स्वखुशीने द्या, असे म्हणत धुमाळ यांनी पैसे मागितल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्तांच्या नावे मागितले २५ लाख
By admin | Published: August 08, 2016 1:43 AM