सोमेश्वरनगर : येणाऱ्या ऊस गळीत हंगामात पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाचे गाळप तब्बल २० ते २५ लाख टनांनी घटणार आहे. अनेक कारखान्यांना गेटकेन उसावर अवलंबून राहावे लागेल. मात्र, जो कारखाना जादा दर देईल, त्याच्या पदरातच गेटकेन ऊस पडणार आहे. ऊसउत्पादकांना जादा दराचे आमिष दाखूवन उसाची पळवापळवी होणार आहे. त्यामुळे या हंगामात ऊसउत्पादाकांची ‘चंगळ’ होणार आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनापुढे जादा ऊस झाल्याने ऊस गाळपाचे आव्हान होते. अनेक कारखाने मे-जूनपर्यंत चालू होते. मात्र, या वर्षी येणाऱ्या हंगामात परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या क्षेत्राबरोबरच उसाचे टनेजही घटले आहे. येणाऱ्या हंगामात उसाची एकरी सरासरी ३० ते ३५ टनांवर खाली येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या हंगामात कमी ऊस असल्याने अनेक कारखान्यांनी सहा महिन्यांपासूनच शेतकी विभागाचे कर्मचारी दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाठविण्यास सुरुवात केली आहे. तेथील ऊसउत्पादकांना जादा पैशाचे आमिष दाखवून ऊस मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आर्थिक गर्तेत गेलेल्या ऊसउत्पादकांना या वर्षी चार पैसे मिळणार आहेत. ज्या वेळी उसाचे क्षेत्र जादा असते, तेव्हा खासगी कारखाने शेतकऱ्यांच्या उसाची बोळवण करून कमी दरात उसाची खरेदी करतात. क्षेत्र घटते, तेव्हा अनेक खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन उसाची पळवापळवी करतात. येणाऱ्या हंगामात या खासगी कारखान्यांना थोपविण्याचे आव्हान सहकारी साखर कारखान्यांपुढे आहे.
२५ लाख टन गाळप घटणार
By admin | Published: September 14, 2016 3:44 AM