पुणे : पिस्तूल आणि काडतुसे बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर यापूर्वी खूनाचे २, खूनाचा प्रयत्न ६, जबरी चोरी ७, घरफोडी ५, चोरीचा १ आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्टचे ४ असे तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. सुनील ऊर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय ३३, रा. पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती दिली़ गुन्हे शाखेचे पोलीस घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याच्या आरोपींच्या शोधासाठी खडक, फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव यांना दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्वती पायथा येथील सार्वजनिक रस्त्यावर देशी पिस्तूल घेऊन एक व्यक्ती उभारली असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना माहिती दिली. त्यांनी लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सुनीलला अटक केली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने शिताफीने पर्वती पायथा या भागात सतत जागा बदलून राहत होता. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खूनाचा प्रयत्न प्रकरणात तब्बल ८ महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, पोलीस हवालदार रिजवान जिनेडी, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड, उमेश काटे, अशोक माने, तुषार खडके, संजय बरखडे, पोलीस शिपाई, तुषार माळवदकर, गजानन सोनूने यांनी ही कारवाई केली.