पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार राज्यात शालाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याकरिता १ ते १० मार्च २०२१ कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात काही जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांत २५ हजार २०४ इतके विद्यार्थी शालाबाह्य आढळून आले आहेत. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात आली नाही. तसेच पिंपरी चिंचवड मनपा व नागपूर मनपा क्षेत्रातही ही मोहीम सुरू करता आली नाही. मात्र, राज्यातील सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या शहरांमध्येच आढळून आले आहेत. त्यात मुंबई उपनगर परिसरात १० हजार १७७, पुणे जिल्ह्यात ३ हजार २७८, नाशिक जिल्ह्यात १ हजार ८६७, नंदुरबार जिल्ह्यात १ हजार ३१६, तर अकोला जिल्ह्यात १ हजार ६४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले.
'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे, हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही. ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल, अशा ६ ते १४ वयोगटातील बालक एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असल्यास त्या बालकांना शाळाबाह्य बालक संबोधले जाते.
महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतर करीत असतात. स्थलांतर करणारी काही कुटुंबे ही आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित समाजातील, गटातील, भूमिहीन, अल्पभूधारक आहेत. साधारणत: सप्टेंबरनंतर ही कुटुंबे, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या राज्यांत स्थलांतर करतात. त्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर येथे तर शेजारी असणाऱ्या कर्नाटक व गुजरात येथे स्थलांतर करतात. ऊसतोडणीसाठी मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतर करताना जरी दिसत असली तरी अनेक कुटुंबे वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्यासाठी स्थलांतर करीत असतात. अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्रामध्ये बालरक्षक चळवळ स्वयंप्रेरणेने अतिशय चांगले काम करीत आहे.
अन्य विभागांचे सहकार्य
कोरोनाच्या जागतिक रोगाच्या प्रादुभार्वामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्यशासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी आणि बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. तरीही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. यासाठी राज्यातील शाळाबाह्य, स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोधमोहीम शिक्षण विभागासह अन्य विभागांच्या सहकार्याने करण्यात आली.
-----------------------------------------------