पुणे : हडपसरपोलिसांच्या तपास पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायात चोरीच्या तब्बल १८ लाख ९० हजार रुपयांच्या २५ महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
कार्तिक प्रकाश भुजबळ, योगेश नवनाथ वजाळे (दोघे रा़ लोणी काळभोर), अभिषेक अनिल भंडगे (रा़ गाडीतळ, हडपसर), निलेश मधुकर आरते (रा़ तुकाई दर्शन, हडपसर), संजय हरीष भोसले (रा़ शेवाळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरते व भोसले यांच्या ताब्यातून १ गावठी पिस्तुल व काडतुसे जप्त केली.
सहायक निरीक्षक संजय चव्हाण यांचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना दुचाकीवरुन जाणारे निलेश व संजय हे पोलिसांना पाहून घाबरुन दुचाकी सोडून पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. दोघांकडे केलेल्या चौकशीत १० महागड्या दुचाकी, गावठी कट्टा असा १० लाख ७० हजारांचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस नाईक नितीन मुंढे, हवालदार प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे हे शनिवारी दुपारी शेवाळवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवरुन तिघे जण जात होते. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही ते पळून जाऊ लागल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कार्तिक, योगेश, अभिषेक या तिघांकडे केलेल्या चौकशीत ८ लाख २० हजार रुपयांच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक माने, अंमलदार प्रदीप सोनवणे, सैदोबा भोजराव, अकबर शेख, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ यांच्या पथकाने केली.