बारामती : खेळाडूंच्या वयचोरी प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुशिल शिवाजी शेवाळे, दीपक विजय शिळीमकर, प्रशिक्षक प्रशांत प्रमोद तेलंग यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.
बारामतीत महाराष्ट्र क्रि केट संघटने तर्फे १९ वर्षाखालील मुलांच्या गटाचे पात्रता फेरीचे सामने या वर्षी जानेवारीपासून घेण्यात आले होते.यात कारभारी जिमखाना क्रि केट संघाचा सामना २६ आणि २७ जानेवारीला पुण्यातील शिळीमकर अॅकॅडमी विरुध्द बारामती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे झाला.या झालेल्या एका सामन्यात शिळीमकर क्रिकेट अकादमीचा खेळाडू अमोल हनुमंत कोळपे हा १९ वर्षांखालील मुलांच्या गटाकडून खेळला होता. मात्र त्याचे वय जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर या बाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.
कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तो २५ वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा गुन्हा नोंदविल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी कारभारी जिमखाना संघाचे सचिव प्रशांत पांडुरंग सातव यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. त्या वरुन अमोल कोळपे, दीपक शिळीमकर, प्रशिक्षक प्रशांत तेलंग आणि पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव सुशील शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील अमोल कोळपे याला अटक होऊन त्यास प्रथम पोलिस व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, मात्र त्याची नुकतीच वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. उर्वरित तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.