- राजेश कणसे, राजुरीयेथील कीर्तनेवाड्यात श्री विठ्ठल, राही, रखुमाई यांचे मंदिर असून, या विठ्ठलभक्तीला तब्बल अडीचशे वर्षांची परंपरा आहे. पंढरपूरसारखाच येथेही विठ्ठलाचा उत्सव साजरा होतो. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. ह.भ.प. रामाजीपंत घनसरे हे पेशवेकालीन स्वराज्यात मामलेदार या हुद्द्यावर होते. ते विठ्ठलाचे भक्त होते. सरकारी नोकरी सांभाळून ते दर वर्षी पायी वारी करीत. ते कीर्तन करीत असल्याने नानासाहेब पेशव्यांनी त्यांना कीर्तने या नावाने संबोधले. दर वर्षी येथे उत्सव साजरा करण्यात येतो. आषाढी एकादशीला तीन दिवस- द्वादशीला महाप्रसाद व त्रयोदशीला गोपालकाला आणि दहीहंडीचा कार्यक्रम असतो. रात्री पाऊलघडीचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होते. गत २५० वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. तो अखंड सुरू राहण्याचे श्रेय समस्त राजूरकर कुटुंबाचे आहे. त्यांचे विठ्ठल मंदिर वेशीजवळ आहे. त्यालाही सुमारे २२५ वर्षे झाली आहेत. त्याच्याही १०-१२ पिढ्यांचा संबंध आहे. या मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना कीर्तने असून, सुरेश कीर्तने हे उपाध्यक्ष तर विष्णू कीर्तने सचिव आहेत. श्रीकांत कीर्तने, अनिल कीर्तने, संजय कीर्तने, श्रीनिवास राजूरकर मंदिर देखभालीची व्यवस्था पाहतात. विजय कापस नावाचे पुजारी मंदिराची देखभाल करतात.
कीर्तनेवाड्यातील विठ्ठलभक्तीला २५० वर्षांची परंपरा
By admin | Published: July 19, 2015 3:47 AM