पुणे : शहरामध्ये राबविण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी पालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानासह विविध उद्यानांमधील जवळपास २ हजार ३४२ चौरस मीटर जमीन हवी आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र संभाजी उद्यानातील (१ हजार ४०० मीटर) असून उद्यान विभागाने मात्र या जागा देण्यास नापसंती दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महामेट्रो कंपनीने महापालिकेला या संदर्भात पत्र दिले असून एकूण १६ हजार ४२५ चौरस मीटर जागेची मागणी केली आहे. सध्या कंपनीकडून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी अशा दोन मार्गांवर वेगात काम सुरू आहे. महामेट्रोला हव्या असलेल्या मालिकेच्या मालकीच्या २७ ठिकाणी असून यामध्ये निळू फुले उद्यान, संभाजी उद्यान, व्हिक्टोरिया गार्डनलगतची ग्रीन बेल्टची जागा, शनिवार पेठेतील नानानानी उद्यान, बंडगार्डन उद्यान, माता रमाई आंबेडकर उद्यान अशा सहा उद्यानांचा समावेश आहे.
संभाजी उद्यानातील वाहनतळ आणि आसपासची जागा अशा एकूण १,४०० चौरस मीटर जागेची आवश्यकता असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या उद्यानाजवळ मेट्रो स्थानक उभारण्यात येणार असल्याने या जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा एकरांमध्ये असलेल्या या उद्यानाचा परीघ आकसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या जागेवर स्थानकाचा जिना आणि पूल बांधण्याचे नियोजन आहे.
या संदर्भात उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उद्यान विभागाने या जागा देण्यास विरोध दर्शविला असून अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीमध्ये महामेट्रो उद्यानांच्या जागांवर कोणते काम करणार आहे, याची सविस्तर माहिती मागविल्याचे सांगितले. त्यानुसार महामेट्रोकडून संभाजी उद्यानात होणाºया कामाचा विस्तृत आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.