पुणे : शहरातील हजारो रुग्ण सध्या गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र, काही महाभाग बाधित असतानाही बिनदिक्कत बाहेर फिरत असतात. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. या रुग्णांचे बाहेर फिरणे बंद करण्यासाठी पालिकेने शक्कल लढविली आहे. गृह विलगीकरणात राहायचे असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांचा ‘बॉण्ड’ लिहून द्यावा लागणार आहे. त्यानंतर गृह विलगीकरणात राहता येणार असून या कालावधीत बाहेर पडल्यास २५ हजारांचा दंड वसूल करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजारांच्या घरात गेली आहे. यातील ३८ हजार ४०१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर, ६ हजार ४२१ रुग्ण हे रुग्णालयात तसेच काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. सोसायट्या, इमारतींमध्ये सध्या कोरोना रुग्ण अधिक आहेत. ज्यांच्या घरात गृह विलगीकरणाची सुविधा आहे, त्यांनाच परवानगी दिली जाते. या रुग्णांवर दररोज संपर्क साधून माहिती घेतली जाते. परंतु, काही रुग्ण कोरोनाला गांभीर्याने न घेता उगाच बाहेर फिरत राहतात. याबाबतच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे पालिकेने ‘अमरावती पॅटर्न’ लागू करण्याचा विचार सुरू केला आहे.
---
घराबाहेर पडला तर २५ हजार रुपये वसूल करणार
अमरावती महापालिका गृह विलगीकरणात राहण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांकडून पंचवीस हजार रुपयांचे बॉण्ड लिहून घेते. विलगीकरण कालावधीत संबंधित रुग्ण घराबाहेर पडला तर त्याच्याकडून बॉण्डमध्ये लिहिल्याप्रमाणे २५ हजार रुपये वसूल करण्यात येतात.
---
रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आराखडा
बॉण्ड लिहून घेतल्यानंतर विलगीकरण कालावधीत त्यांच्या घरी अचानक भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. रुग्ण राहत असलेल्या साेसायटीचे अध्यक्ष, सचिव, रुग्णांचे शेजारी यांना याबाबत कल्पना दिली जाणार असून रुग्णांवर कसे लक्ष ठेवायचे याचाही आराखडा तयार केला जात आहे.