पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर व साेलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ५९ गावांमध्ये २५७ गुरांना लम्पी चर्म राेगाची लागण झाली असून, त्यापैकी १२२ उपचाराअंती बरी झाली आहेत. तर, सध्या १३२ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात तीन जनावरांचा मृत्यू झाला असून, उर्वरित चारही जिल्ह्यांत एकही मृत्यूची नाेंद झाली नाही. तर ९५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
राज्यात सर्वप्रथम या वर्षी ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पीची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाट्याने अहमदनगर, धुळे, अकोलासह पुणे, काेल्हापूर, सातारा सांगली व साेलापूर या जिल्ह्यांमध्येही झपाट्याने पसरला. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात एकूण १९ तालुके लम्पीने बाधित झाले आहेत. तर पुणे वगळता इतर चारही जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. पशुपालकांनी लम्पीसदृश्य आजाराची लागण गुरांना झाल्यास याेग्य ती काळजी घेऊन त्याची माहिती जवळच्या शासकीय पशुवैद्यक केंद्राला द्यावी, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डाॅ. देवेंद्र जाधव यांनी दिली.
पुण्याला सर्वाधिक फटका
हा राेग पश्चिम महाराष्ट्रातही पसरत असून, याचा सर्वाधिक फटका हा पुण्याला बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ५९ गावांपैकी पुणे जिल्ह्यातील ४३ गावे आहेत. तर २५७ बाधित जनावरांपैकी एकट्या पुण्यातील १४९ आहेत. तसेच ३ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक ६७ हजार जनावरांचे लसीकरणदेखील पुण्यात झाले आहे.
ही आहेत लक्षणे :
- प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, ताप येतो, दूध उत्पादन कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.- १०-५० मि.मि. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर येतात.- तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.- डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर सुज येऊन काही जनावरे लंगडतात.
ही काळजी घ्या :
- बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता राखावी.- आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.- लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय विभागाला संपर्क साधावा.- बाधित जनावरांना पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.- रोगाचा प्रसार बाह्यकिटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करण्यासाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २-३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉईल २ टक्के यांचा वापर करता येईल.- याने जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची ८ फूट खोल खड्ड्यात गाडून त्यावर मृत जनावरांच्या खाली चुन्याची पावडर टाका.