पुणे : गजानन मारणे आणि नीलेश घायवळ यांच्या टोळी युद्धातून एकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीतील २६ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मात्र, पुराव्यांअभावी विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी २६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.दत्तवाडी येथे मे २०१० मध्ये मारणे आणि घायवळ यांच्या टोळीयुद्धातून सचिन कुडले याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर अतुल कुडले याच्या तक्रारीवरून पोलिसांनी घायवळ टोळीतील २६ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती.
८ मे २०१० रोजी घायवळ टोळीतील आठ जणांनी चार दुचाकींवरून येऊन सचिन कुटलवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीत मृत्यू झाला. त्यानंतर टोळक्याने पप्पू कुडलेच्या कारचा पाठलाग केला. त्याने कार दत्तवाजी पोलीस चौकीजवळ थांबवली. परंतु, तो चौकीत जाण्याच्या आधीच त्याच्यावर नीलेश घायवळचा हस्तक संतोष गावडे याने गोळी झाडली. त्यात त्याच्या हाताला जखम झाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मारणे आणि घायवळ टोळीच्या वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयात खटला सुरु असताना सरकारी पक्षाकडून २५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील पोलिसांव्यतिरिक्त १७ जणांनी आपली साक्ष बदलली. खून करणे आणि दंगल घडवणे हे सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने २६ जणांची निर्दोष मुक्तता केली.