कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व पालकांना मागील वर्षाची पुस्तके शाळेत जमा करावेत, असे आवाहन केले आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यातच जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे पालक व शिक्षक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे अद्याप पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये जुनी पुस्तके जमा झाली नाहीत. शहरी भागातील काही खासगी शाळांनी मात्र शालेय पोषण आहार वितरणाच्या निमित्ताने काही पालकांकडून पुस्तके जमा करून घेतली आहेत.
पुणे जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे २ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यात जिल्हा परिषदेच्या दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी निकालाच्या दिवशी अधिकारी पालकांकडून जुनी पाठ्यपुस्तके जमा करून घेण्याचे नियोजन केले आहे.
-------------
पुणे जिल्ह्यात किती जुनी पाठ्यपुस्तके जमा होतील, याबाबतचा आढावा जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. त्यात शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २६ हजार पालक पाठ्यपुस्तके जमा करतील, अशी माहिती प्राप्त झाले आहे.
- सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
-----------
जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके पालकांमार्फत शाळेत जमा करावी, यासाठी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना यांच्याकडून आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. सध्या किती पुस्तके जमा होऊ शकतात, याबाबत अंदाजे माहिती शिक्षण विभागाला कळविण्यात आली आहे.
- नारायण शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे जिल्हा
--------------------
शाळेने दिलेल्या सूचनेनुसार निकालाच्या दिवशी माझ्या पाल्याची जुनी पुस्तके मी शाळेत जमा करणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळेत जाऊन पुस्तके जमा करता येत नाहीत. ही पुस्तके पुढील वर्षी दुसऱ्या विद्यार्थ्याला वापरता येऊ शकतील. त्यामुळे शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
- तात्यासाहेब शिंदे ,पालक, मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर