संभाजी महाराज स्मारकासाठी २६९ कोटी तर अष्टविनायक आराखड्यास ३३ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:29 PM2022-06-06T13:29:00+5:302022-06-06T13:30:02+5:30

मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम ठेवणार...

269 crore for Sambhaji Maharaj memorial and 33 crore for Ashtavinayak plan | संभाजी महाराज स्मारकासाठी २६९ कोटी तर अष्टविनायक आराखड्यास ३३ कोटी मंजूर

संभाजी महाराज स्मारकासाठी २६९ कोटी तर अष्टविनायक आराखड्यास ३३ कोटी मंजूर

Next

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधिस्थळाच्या २६९ कोटी ३४ लाख रुपये तसेच अष्टविनायक विकास आराखड्यास ३३ कोटी ५७ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास रविवारी मान्यता देण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार महादेव जानकर, अतुल बेनके, दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, संजय जगताप, सुनील शेळके, माधुरी मिसाळ, राहुल कुल, संग्राम थोपटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.

मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम ठेवणार

सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व तालुक्यांत आवश्यक तेथे अंगणवाडी बांधणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देत आहेत. रस्ते विकासालाही गती देणार आहे. तर अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी तरतूद केली असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देऊ. विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप व सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे विशेष लक्ष द्या

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधिस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधिस्थळाला भेट देण्यासाठी नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: 269 crore for Sambhaji Maharaj memorial and 33 crore for Ashtavinayak plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.