पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी ६१ अर्ज विकले गेले. यात कसबा पेठ विधानसभेसाठी १६ उमेदवारांनी २७, तर चिंचवड मतदारसंघासाठी २० उमेदवारांनी ३४ अर्ज नेले. अद्याप कोणीही अर्ज भरलेला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या दाेन्ही जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारपासून (दि. ३१) अर्ज भरण्यास सुरुवात झाली. यात भाजपसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे शहराच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. चिंचवडसाठी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांची नियुक्ती केली आहे. अर्ज भरण्यास सात फेब्रुवारीची मुदत आहे.
तांत्रिक तपासणी पूर्ण
दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण ७८० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी एकूण एक हजार ७२० ईव्हीएम मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व मशीनची पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा या मशीनची तपासणी केली जाणार आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.