पुणे : राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकूण ४६४ पुस्तके असून राज्यात १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी २०० पुस्तके वाटण्यात आली आहेत. त्यातील २७ पुस्तकांमध्ये बहुजन महापुरुषांची बदनामी करण्यात आली असून, ही पुस्तके तत्काळ मागे घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.
दोषी असणाऱ्या सर्व अधिकाºयांचे निलंबन करावे व लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अर्थक्रांतीचे राज्य समन्वयक प्रभाकर कोंढाळकर आदी उपस्थित होते. या सर्व वादग्रस्त पुस्तकांचे लेखक हे आरएसएसशी संबंधित असून त्यांनी खोटा इतिहास पसरविण्याचे षड्यंत्र आखल्याचा आरोप करण्यात आला.
संतोष शिंदे म्हणाले, ‘‘डॉ. शुभा साठेलिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकात छत्रपती संभाजीमहाराज यांचा ‘दारूड्या’ असा उल्लेख करून ‘राजा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता,’ अशी बदनामी करण्यात आली आहे. तर, गोपीनाथ तळवलकरलिखित ‘संताचे जीवन प्रसंग’ पुस्तकात तुकाराम महाराजांना ‘हे आमचं येडं’ असे त्यांच्या पत्नीच्या तोंडातून वदवून घेण्यात आले आहे. प्र. ग. सहस्रबुद्धेलिखित ‘छत्रपती राजा शिवाजी’ यात शिवरायांचे रामदासीकरण करण्यात आलेले आहे. तर, डॉ. प्रभाकर चौधरीलिखित ‘सद्गुणांच्या गोष्टी’ या पुस्तकात रामदास शिवरायांना म्हणतात, ‘सारं राज्य मला देऊन टाकल्यावर तुम्ही काय करणार...?’ शिवाजी महाराज म्हणाले, ‘मी तुमच्यासोबत येईन, भिक्षा मागेन’ आणि ‘राजांनी डोक्याचा पटका सोडून त्याची झोळी केली,’ असा उल्लेख आहे.’’
सिंहगड सोसायटीने शिष्यवृत्तीचा केला अपहारसिंहगड एज्युकेशन सोसायटीकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची १ हजार ७७९ विद्यार्थ्यांची ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता अपहार केला असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, याप्रकरणी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज चतु:शृंगी पोलीस ठाण्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या १६ आॅक्टोबर रोजी कार्यकर्ते व विद्यार्थी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतील.
सदानंद मोरे यांची समितीवर नेमणूक नकोमहापुरुषांची बदनामी केलेल्या पुस्तकांच्या चौकशी समितीवर सदानंद मोरे आणि पांडुरंग बलकवडे यांना नेमण्यात येऊ नये. मोरे हे सरकारची तळी उचलण्याचे काम करतात. त्याऐवजी खरा इतिहास लिहिणाºया लेखकांची या समितीवर नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली.