पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सध्या सुरू असून, या प्रक्रियेसाठी नेमलेल्या डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या कुलगुरू शोध समितीने मुलाखतीसाठी एकूण २७ जणांना पात्र ठरविले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीच्या मुलाखतींना गुरुवारपासून आयआयटी मुंबईत सुरुवात झाली आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या एकूण २७ जणांच्या मुलाखती दोन दिवसांत होणार आहेत. पात्र व्यक्तींमध्ये नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. उद्धव भोसले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. विजय फुलारी, प्रा. अशोक चव्हाण यांचा समावेश आहे.
कुलगुरूपदी नक्की कोणाची वर्णी लागणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. शोध समितीकडून पात्र व्यक्तींमधील पाच नावे अंतिम करून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर राज्यपाल पाच जणांच्या मुलाखती घेतील. त्यापैकी एकाचे नाव राज्यपाल जाहीर करतील.