लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातल्या मेळघाटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मुलगा जिद्दीने जिल्हाधिकारी झाला आणि आता त्याचे पोस्टिंग थेट जम्मू-काश्मीरमधल्या कारगिलमध्ये झाले आहे. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी संतोष सुखदेवे हे कारगिलचे जिल्हाधिकारी बनले आहेत.
कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संतोष यांना कारगिल माहीत होते ते फक्त बातम्यांमधूनच. कारगिलचे युद्ध झाले तेव्हा संतोष अवघ्या सहा वर्षांचा होता. मेळघाटातल्या धारणीजवळच्या नारवटी या जेमतेम सहाशे-सातशे लोकवस्तीच्या गावात राहणारा. हातातोंडाशी गाठ असलेलं त्याचं कुटुंब. गावातले लोक छोट्या-छोट्या कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालताना संतोष लहानपणापासूनच पाहात आला होता. पण त्याच सरकारी पदावर जाऊ, असा विचार त्याने बारावी होईपर्यंतही केला नव्हता.
पहिली ते चौथीपर्यंत संतोष जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात हुशार असल्याने पुढच्या शिक्षणासाठी तो जवळच्या गावात गेला. त्याची हुशारी पाहून शाळेतल्या एका शिक्षकांनी त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायला सांगितले. अमरावतीच्या नवोदय विद्यालयात संतोषने प्रवेश घेतला आणि हाच त्याच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
बारावीपर्यंत ‘नवोदय’मध्ये शिकल्यानंतर संतोषने गुणवत्तेच्या आधारावर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) प्रवेश मिळवला. पुण्यात राहायचे कोठे हा प्रश्न होता. गोखलेनगरच्या विद्यार्थी सहायक समितीने हा प्रश्न सोडवला. शिष्यवृत्ती आणि ‘कमवा शिका’मधून शिक्षणाचा खर्च भागवायला त्याने सुरुवात केली.
संतोष सुखदेवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना मदत करायचो आणि ते मला आवडत होतं त्याचं समाधान मिळत होतं. गावी लोकांचे होणारे हाल मी पाहिले होते. त्यातून ठरवलं की ज्यातून बदल घडवता येईल असं काही आपण करू. दोन पर्याय होते. ‘एनजीओ’त काम करणे आणि दुसरा म्हणजे सरकारी नोकरी. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला.”
इंजिनिअरिंगच्या शेवटचा वर्षाला असताना संतोष यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. जवळपास दीड वर्ष तयारी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले. निकाल लागल्यावर त्यांनी आई-वडिलांना निकाल कळवला तेव्हा आई म्हणाली, “चांगलं झालं तुला सरकारी नोकरी लागली.” मुलगा आयएएस झाला म्हणजे काय हेही त्या माऊलीला माहिती नव्हते. प्रशिक्षणानंतर त्यांना जम्मू काश्मीर केडर मिळाले.
आधी ‘एसडीएम’ म्हणून काम केल्यावर संतोष यांना जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाले तेही थेट कारगिलचे. संतोष सांगतात, “ज्या खुर्चीवर बसायचे स्वप्नं होते ते पूर्ण झाले. पण हे स्वप्न आव्हानेही घेऊन आले आहे. कारगिल विकासाच्या बाबतीत अगदी मागे आहे. शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे येथे बेरोजगारी खूप आहे. पर्यटक येतात तेही धावती भेट द्यायला. यामुळे कामाला खूप वाव आहे. मेळघाटच्या अडचणी अनुभवल्या असल्याने जमिनीशी नाळ जोडलेली आहे. येथून पुढेही तेच करायचं आहे.”