राजगुरुनगर: खेड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मधील आणि डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना, आरक्षण आदी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातील १,८४९ ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या काळात संपली आहे तर, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या १३ महिन्यांच्या काळात ६,४७७ ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार आहे. अशा सर्व ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती, प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित करुन प्रत्यक्ष निवडणूक अशा तीन टप्प्यातील कार्यक्रम येत्या डिसेंबरपासून करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.
शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ पासून प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायतीचे गुगल नकाशे काढून प्रभाग रचनेचा स्थळ पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे. ९ डिसेंबर पर्यंत प्रभाग पाडणे आणि सीमा निश्चित करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे, ३१ डिसेंबरला आरक्षण सोडतीसाठी ग्रामसभांचे आयोजन करणे ३ ते १० जानेवारी २०२२ ला प्रभाग रचना,आरक्षण यावर हरकती सूचना मागवणे, १९ जानेवारीला उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांच्यासमोर प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. नंतर सर्व सोपस्कार झाल्यानंतर अंतिम ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्यानंतर २ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.
या ग्रामपंचायतींची होणार निवडणूक
येणिय खुर्द, गारगोटवाडी, येलबाडी, कोरेगाव खुर्द, भांबोली, चास, रोहकल, बहुळ, देवोशी, मांजरेवाडी, शिरोली, सुरकुंडी, अनावळे, बहिरवाडी, आंभू , आव्हाट, दौडकरवाडी, मिरजेवाडी, वाडा, पापळवाडी, सिद्धेगव्हाण, साकुर्डी, शेलगाव, साबळेवाडी, चिखलगाव, खरपुड, दरकवाडी, कोयाळी तर्फे वाडा.