गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत संगमनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र जोगवडी यांच्या सहकार्याने कोरोना सुपरस्पेडरचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३४ जणांची तपासणी झाली असून, त्यापैकी २१ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गटविकास आधिकारी विशाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी डॉ. समीर पवार, संदीप सावंत, ग्रामसेवक प्रसाद सोले, किशोर धुमाळ, प्रतिभा नलावडे, राणी नेवसे, संतोष लोखंडे यांच्या पथकाने गावात केली.
संगमनेर गावात भाजीविक्रेते, व्यावसायिक, नागरिक यांची तपासणी केली आहे. सध्या गावात ४९ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आले असून, त्यातील १३ जणांना उपचार करून घरी सोडले आहेत. गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, ग्रामपंचायत आरोग्य तपासणी करीत आहेत. कोरोना वाढू नये म्हणून सर्व प्रकारचे नियोजन गावात करण्यात येत असल्याचे ग्रामसेवक प्रसाद सोले यांनी सांगितले.
संगमनेर गावात एकाच दिवसात २१ कोरोना रुग्ण आढळल्याने गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आजूबाजूच्या गावातील लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.