पुणे : शहरातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होऊन ते पूर्ण झाले, त्या घटनेला या महिन्यात २८० वर्षे पूर्ण होत आहेत. श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे यांनी या मंदिराचे बांधकाम सुरू केले होते. शिवरामभट चित्राव यांनी बांधकाम पूर्ण करून १७३८च्या आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली, अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. या मंदिराला शासनाने पुणे शहराचा पुरातत्त्व वारसा अ म्हणून संरक्षित केले असून, देवस्थान क दर्जा दिला आहे. पुण्याच्या इतिहासाचे संशोधक मंदार लवाटे म्हणाले, ‘‘चिमाजीअप्पा पेशवे यांनी आॅक्टोबर १७३६मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. शिवरामभट चित्राव यांनी दोन वर्षांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर जुलै महिन्यात आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली, अशी नोंद पेशवे दप्तरातील रोजकिर्दीमध्ये आहे.’’ पानशेतच्या प्रचंड पुरामध्येही या मंदिराभोवतालच्या तटबंदीमुळे मंदिराला फारशी झळ बसली नाही. नगारखाना व तटबंदीचे अवशेष आजही भक्कम अवस्थेत आहेत.श्रावण महिन्यातील सोमवारी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मुठा नदीला पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याचा शिवलिंगाला स्पर्श होत असे, त्या वेळी ती मोठा पूर आल्याची खूण मानली जात असे.
ओंकारेश्वर मंदिराच्या बांधकामास २८० वर्षे पूर्ण
By admin | Published: October 12, 2016 2:59 AM