पुणे : विक्रमी बस मार्गावर आणून प्रवाशांना सुखद धक्का देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा दुसरा बस डे संत तुकाराम बीज म्हणजे दि. ११ मार्च रोजी होणार आहे. या दिवशीही १८०० हून अधिक बस मार्गावर आणून २ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प पीएमपी प्रशासनाने केला आहे. प्रत्येक महिन्यातील एका दिवशी बस डे साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘पीएमपी’च्या पहिल्यावहिल्या बस डे दिवशी (दि. १० फेब्रुवारी) प्रशासनाने विक्रमी १८३३ बस मार्गावर आणल्या होत्या. आतापर्यंतच्या पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या बस मार्गावर धावल्या. या बस डे बाबत प्रशासनाकडून पुरेशी प्रसिध्दी करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा बस डे प्रवाशांसाठी सुखद धक्का देणारा ठरला. यादिवशी बससंख्या वाढण्याबरोबरच प्रवासी संख्या तसेच उत्पन्नातही वाढ झाली. पीएमपीने दोन कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरविले होते. पण १ कोटी ८३ लाख रुपये उत्पन्नावर समाधान मिळाले. अपेक्षित उत्पन्न मिळाले नसले तरी अधिक बस मार्गावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस आहेत. सध्या मार्गावर १५५० ते १६०० बस येतात. बस डे दिवशी चालक-वाहकांच्या सुट्टया रद्द करून अधिक बस मार्गावर आणण्यात आल्या होत्या.
या दिवशी १८०० हून अधिक बस मार्गावर आणल्या जाणार आहेत. प्रमुख मार्गांवर दर पाच मिनीटाला बस सोडण्याचे नियोजन आहे. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळी २०० जादा शटल बसेस सोडण्यात येणार आहेत. मुख्य स्थानकांवर आगार प्रमुख व सहाय्यक यांचेकडून प्रवाशांचे स्वागत व मार्गदर्शन केले जाईल. मुख्य बसथांब्यांवर चेकर तसेच बीआरटी मार्गावर फिल्ड आँफिस प्रवाशांनामाहिती देतील. स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी लाऊड स्पीकरवर उदघोषणा केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतुक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. पुणे प्रदूषणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक खासगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.