धनकवडी : संविधान दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात जय भीम चित्रपट दाखवण्यासाठी उभारण्यात आलेली स्क्रीन अंगावर पडून तीन लहान मुले गंभीर जखमी झाली. प्रांजल विजय अदनामे (वय ६ वर्षे), अनुष्का विशाल रणदिवे, (वय ६ वर्षे), सौरभ जालिंदर पाटोळे, (वय ७ वर्षे) (सर्व रा.तळजाई, पदमावती) अशी जखमी मुलांची नावे असून ही घटना तळजाई वसाहत येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी नगरसेवक सुभाष जगताप व टेम्पो चालकाविरुध्द सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संविधान दिनानिमीत्त नगरसेवक सुभाष जगताप यांनी पन्नालाल लुकंड शाळेसमोर, तळजाई वसाहत पद्मावती येथे बिगर परवाना जयभिम सिनेमा स्किनवर दाखविण्याचे आयोजन केले होते. यासाठी स्क्रिनला जोडलेली इलेक्ट्रिक वायर ही रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या डीपीमधुन कोणतेही परवानगी न घेता व त्याबाबत कोणतेही सुरक्षित उपाययोजना न करता हवेतुन थोड्याच अंतराववरुन स्क्रिनला जोडली होती.
सिनेमा पाहण्याकरीता लहान मुले व इतर लोक स्क्रिनसमोर बसले होते. दरम्यान तळजाई माता मंदिराकडुन छोटा हत्ती टेम्पो स्क्रिनच्या बाजुने जात असताना ती वायर टेम्पोला अडकल्याने पिक्चरची स्क्रिन समोरच बसलेल्या मुलांच्या डोक्यात पडली. यात तीन मुले गंभीर जखमी झाली. मुलांच्या पालकांच्या वतीने कोणीही तक्रार देण्यास न आल्याने पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल केली. यातील एक सहा वर्षाची मुलगी अत्यवस्थ आहे. तीच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.
''संविधान दिनाच्या निमित्ताने एका मंडळाच्या वतीने जयभीम हा चित्रपट दाखविण्यात आला होता, त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. यात जाणूनबुजून माझे नाव घेण्यात आले असल्याचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सांगितले.''