पुणे : नावात छोटासा बदल करून परस्पर दुसरी कंपनी स्थापन करून अमेरिकेतील भागीदाराने नव्या कंपनीत सर्व व्यवसाय हस्तांतरित करून ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अमेरिकेतील भागीदारावर गुन्हा दाखल केला आहे़अप्रतिम दत्ता ऊर्फ टिन दत्ता (वय ४७, रा़ हाय माउंटन, लिंकन पार्क, न्यूयार्क) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे़ या प्रकरणी रजनिश कुमार (वय ४२, रा़ कस्तुरबा पथ, जि़ सहरसा, बिहार) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले की, रजनिश कुमार यांच्या कंपनीचे अमनोरा पार्क येथे कार्यालय आहे़ रजनिश आणि दत्ता हे दोघे भागीदार असून त्यांची अमेरिकेत स्वॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे़ त्यात दत्ता यांचे ३८ टक्के शेअर असून ते संचालक आहेत़ या दोघांनी २०१५ मध्ये भारतात व्हेरिफिशंट टेक्नॉलॉजी इंक नावाची कंपनी सुरू केली़ या कंपनीच्या नावासारखीच व्हेरिफिशंट टेक्नॉलॉजी प्रा़ लि़ या नावाची बनावट कंपनी ३ मे २०१७ रोजी स्थापन केली़ त्याची काहीही माहिती रजनिश व इतर गुंतवणूकदारांना न देता जुन्या कंपनीची वेबसाईट, लोगो, ई-मेल अकाउंट्स व कंपनीचे कामगार, आॅफिस फर्निचर, लॅपटॉप, कॉम्प्युटर, जागा यांचा बनावट कंपनीसाठी वापर केला़ व्हेरिफिशंट टेक्नॉलॉजी इंकचा सर्व व्यवसाय त्या बनावट कंपनीमध्ये हस्तातरीत करून कंपनीमध्ये आॅनलाइन ३ कोटी ५ लाख रुपये (४ लाख ४६ हजार डॉलर) ट्रान्सफर करून रजनिश यांची फसवणूक केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे अधिक तपास करीत आहेत़
बनावट कंपनीद्वारे ३ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:19 AM