लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील खोपोली एक्झिटजवळ एक खासगी ट्रॅव्हल्स बस दोन्ही मार्गाच्या मध्यभागी असलेल्या पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण ठार, तर १५ जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.बोर घाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून मुंबईला येत असणाऱ्या जय सेवालाल ट्रॅव्हल्स बसचा (क्रमांक - यूपी ८३ टी ०९३०) ब्रेक खोपोली घाटातील आडोशी येथील तीव्र उतारावर निकामी झाला. बसचालकाने प्रसंगावधान राखत मोठा धोका टाळण्यासाठी बस दोन्ही मार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षक दुभाजकाकडे घेतली. मात्र, उतारामुळे बसवर नियंत्रण ठेवण्यात चालकाला अपयश आले. त्यामुळे बस दोन्ही मार्गामधील पुलाच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. यामध्ये बसच्या केबिनमध्ये बसलेले दोन चालक आणि एक प्रवासी बसमधून दरीत पडल्याने त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. बसचा सहायक चालक जितू चव्हाण (वय २६, रा. कर्नाटक) आणि मोहन राठोड (२६) अशी मृतांची नावे आहेत. अन्य एका मृताचे नाव समजू शकले नाही.बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी मजूर आहेत. कर्नाटक येथून मुंबई व परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्यासाठी खाजगी बसने ते सर्वजण येत होते. यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. वेगात असलेली बस पुलाचा कठडा तोडून थांबली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. (प्रतिनिधी) ब्रेक निकामी झाल्यानंतरही चालकाचे प्रयत्नबसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. भरधाव वेगातील बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने रस्त्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बस नेऊन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सुमारे १०० फुटापेक्षा अधिक अंतरावर जाऊन बसने पुलाच्या कठड्याला धडक दिल्यानंतर बस थांबली. यावेळी बसचा पुढील काही भाग पुलाच्या मोकळ्या जागेत अडकला होता. बस जर पुलाच्या कठड्याला अडकून थांबली नसती तर या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले असते. दोघे गेले असले तरी अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.
एक्स्प्रेसवेवरील भीषण अपघातात ३ ठार
By admin | Published: March 18, 2016 2:43 AM