पुणे : पाषाण येथील पंजाब नॅशनल बँकेच्या पाषाण सर्कल एटीएम येथे पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन तब्बल १ हजार ३० जणांच्या बँकविषयक गोपनीय माहिती चोरुन त्याद्वारे फसवणूक करणाºया तिघा परदेशी नागरिकांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे़
इरिमा ड्रेगॉरा जुनेट (वय २६), लाझर अलिन क्रेस्टी (वय २२) आणि बॅलन फ्लोरिया क्रिस्टीनेल (वय ४४, सर्व रा़ रोमानिया) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्याकडून क्लोन केलेले ५४ बनावट एटीएम कार्ड, एक स्किमर, दोन लॅपटॉप, तीन मोबाईल तसेच २ लाख ४४ हजार रुपये जप्त केले आहेत़
याबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी माहिती दिली़ पाषाण सर्कल येथील पंजाब नॅशनल बँकेच्या खातेधारकांच्या खात्यातून ११ डिसेंबरपासून परस्पर बंगलोर येथून एटीएमद्वारे पैसे काढण्यात येत असल्याच्या तक्रारी चतु:श्रृंगी पोलीस आणि बँकेकडे येऊ लागल्या़ एकाचवेळी अनेक नागरिक फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन येऊ लागल्याने बँकचे व्यवस्थापक मोहमद आरीफ आजाद हुसेन यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली़ दोन दिवसात जवळपास ६ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या़
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करुन फसवणूक झालेल्या खातेधारकांच्या खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या पाषाण सर्कल येथील एटीएम सेंटरमधून आॅक्टोंबर २०१७ मध्ये ज्या ज्या बँक खातेदारांनी एटीएम कार्डद्वारे पैसे काढले़ त्याच खातेदारांच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डद्वारे बंगलोर येथील एटीएम सेंटरमधून वेगवेगळ्या वेळी रक्कमा काढल्याचे निष्पन्न झाले़ त्यावरुन चतु:श्रृंगी पोलिसांचे एक पथक तातडीने बंगलोरहून रवाना झाले़ ज्या ज्या ठिकाणाहून पैसे काढले गेले़ त्या ठिकाणी जाऊन या पथकाने टेहाळणी करीत असताना अचानक या आरोपींनी वसई येथील एटीएम मधून पैसे काढण्याचे काम सुरु केले़ त्यामुळे नव्याने पुन्हा आणखीन एक पथक तयार करुन तातडीने वसईला एक पथक पाठविण्यात आले़ बंगलोर येथील पथकाला तातडीने मुंबईला बोलवून घेण्यात आले़ दोन्ही पथके वसई येथे असताना सहायक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बँकाचे कार्ड क्लोनिंग करुन एटीएम सेंटरमधून रक्कमा काढणाºया परकीय नागरिकांविषयी माहिती मिळाली़ दोन्ही पथकांनी एकमेकांशी समन्वय साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी तिघांनाही रंगेहाथ पकडले़
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, सहायकन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, दत्ता शिंदे, पोलीस नाईक विकास मडके, सचिन गायकवाड, अजय गायकवाड, प्रविण पाटील, अमर शेख या पथकाने केले़ त्यांना पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, हवालदार सरवदे, पोतदार, अविनाश सातव, ताथवडे, काकडे, ढमाळ, ससार, सचिन कांबळे यांची मदत झाली़
़़़़़
८९० खातेदारांची लुट रोखली
परदेशी नागरिकांनी आॅक्टोंबरमध्ये १०३० खातेदारांची गोपनीय माहिती स्वत:कडे जमा केली होती़ त्यानंतर तब्बल दोन महिने त्यांनी वाट पाहिली़ जेणे करुन पैसे कोणालाही मागमूस लागू नये़ पण, एकापाठोपाठ एक तक्रारी येऊ लागल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी तातडीने हालचाल करुन बंगलोर व त्यापाठोपाठ वसईत त्यांचा माग काढल्याने ते हाती लागू शकले़ या चोरट्यांकडे अजून ८९० खातेदारांची माहिती होती़ ते वेळीच सापडले नसते तर त्यांच्याही खात्यातून पैसे काढले गेले असते़ चतु:श्रृंगी पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांची लुट रोखण्यात पोलिसांना यश मिळाले़