पुणेः दाेन दिवसात भिंत काेसळण्याच्या दाेन घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. स्तलांतरीत कामगारांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे. त्या सर्वांची नाेंद करणे कामगार विभागाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून लक्ष देण्यात येणार आहे. त्याचबराेबर या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिले.
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाची सिमाभिंत काेसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. साेमवारी रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. साेमवारी रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाला. सिंहगड महाविद्यालयाच्या सिमाभिंतीच्या आत काही झाडे हाेती. जाेरदार पाऊसामुळे झाडांची मुळे सैल झाल्याने तसेच जाेरदार पाऊस असल्याने झाड भिंतींवर काेसळले तसेच भिंत कामगारांच्या 3 झाेपड्यांवर काेसळली. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. या भागात सुरु असलेल्या एका इमारतीचे बांधकाम साईटवर हे मजूर काम करत हाेते. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यातील हे मजूर हाेते.
घटनेची माहिती मिळताच सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बाेलताना राम म्हणाले, काेंढवा येथील भिंत काेसळल्याची घटना घडल्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून शहरातील 287 ठिकाणांची पाहणी करण्यात आली हाेती. त्यात सहा हजार आठडे झाेपड्यांची पाहणी केली. त्यातील ज्या झाेपड्यांना तसेच घरांना धाेका हाेता, त्यांना इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले हाेते. वडगाव बुद्रुक या भागात पालिकेची टीम आली नव्हती. एक दाेन दिवसात ते या ठिकाणाची देखील पाहणी करण्यासाठी येणार हाेते. त्या आतच ही दुर्देवी घटना घडली. ही घटना नैसर्गिक तसेच मानवनिर्मित चुकांमुळे घडली आहे. या ठिकाणच्या लाेकांना भिंत पडेल असे वाटले सुद्धा नसेल. जाेराच्या पावसामुळे व येथे असलेल्या झाडामुळे ही भिंत काेसळली.
प्राथमिक माहितीनुसार छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधील हे कामगार आहेत. त्यांना येथे काम करण्यास काेणी आणले, ते किती वर्षांपासून येथे राहत हाेते याची आम्ही माहिती घेत आहाेत. शासनाच्या वतीने पिडीतांना मदत करण्यात येईल. अवघ्या तीन दिवसात अशा दाेन घटना घडणे दुर्देवी आहे. भिंतीच्या आतमध्ये असणारे झाड पडल्याने भिंत पडल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. स्तलांतरीत कामगारांच्या नाेंदणीबाबत प्रशासनाकडून लक्ष देण्यात येत आहे. त्याचबराेबर बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन धाेकादायकरित्या कामगार राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना आधीच देण्यात आल्या आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील राम यांनी दिले.