विवाहितेची आत्महत्या
पुणे : लग्नात मला काहीच दिलेले नाही, त्यामुळे तुझ्या आई-वडिलांकडून कपाट, फ्रिज, दिवाळीत अंगठी पाहिजे, अशी मागणी करुन छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सपना अक्षय घोलप (वय २४, रा. रामनगर , वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वारजे पोलिसांनी सपना हिचा पती अक्षय व सासू सुनिता घोलप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...............
सव्वा दोन लाखांची दारु लंपास
पुणे : मांजरी येथील देशी दारु व बिअर शॉपीचे दुकान बंद असताना चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील २ लाख १९ हजार १७० रुपयांची दारु चोरुन नेली. याप्रकरणी समीर घुले (वय ३५, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. घुले यांचे मांजरीतील माडगे वस्ती येथे बी ॲन्ड जी कंट्री लिकर या नावाचे देशी दारु व बिअर शॉपी आहे. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून चोरी केली.
.............
रिक्षाप्रवाशावर चाकू हल्ला
पुणे : मित्रांबरोबर रिक्षाने जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी आवाज कोणाला दिला असे म्हणून वाद घातला. त्यानंतर तरुणावर चाकूने हल्ला करुन जखमी केले. ही घटना शास्त्री रोडवरील हॅपी हाऊससमोर घडली. याप्रकरणी राहुल राजेंद्र हगवणे (वय २८, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.