नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पीएम किसान सन्मान योजनेतील पात्र शेतकरीच राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतही पात्र ठरणार आहेत. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी नव्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सव्वातीन लाख शेतकऱ्यांचे अर्ज महसूल विभागाच्या मान्यतेअभावी प्रलंबित आहेत. कृषी विभागाने दिलेली आकडेवारी चुकीची असून शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांना पात्र ठरविण्यात येत असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या साठमारीत हे शेतकरी केंद्राच्या चौदाव्या व राज्याच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची भीती आहे.
राज्यातील एक कोटी १७ लाख तीन हजार ८८९ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ९७ लाख ७४ हजार ४३० शेतकरी यासाठी पात्र ठरले. मात्र, त्यानंतर या योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार पात्र केलेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात ७१ लाख चार हजार ४८४ इतकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज केलेले आहेत.
शेतकऱ्यांनी अपलोड केलेले कागदपत्र पडताळणी करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष बोलावून पात्र ठरवले जात आहे. नवे उतारे जोडावे लागतात. त्यानंतरच त्यांना पात्र केले जाते, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
चौदावा हप्ता लवकरच
- पीएम किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता येत्या आठवडाभरात मिळण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारची नमो शेतकरी योजना लागू केली जाणार आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनांचा मिळून चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागाने शेतकऱ्यांना पात्र न ठरवल्यास राज्यभरातील सुमारे तीन लाख १४ हजार शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.