मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती येथे गुरुवारी सकाळी बिबट्याचे तीन बछडे ऊस तोडणी चालु असताना उसतोडणी कामगारांना आढळून आले. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्यांना पेठ अवसरी वन उद्यानात उपचारासाठी नेले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती शिंगवे रस्त्यावर गावाजवळच लोंढेमळा आहे. येथे विनायक पंढरीनाथ लोंढे यांच्या शेतातील ऊसतोड चालू होती. त्यावेळी ऊसतोडणी कामगारांना गुरुवारी (दि.१७) सकाळी बिबट्याचे तीन बछडे (अंदाजे दोन महिन्याचे) आढळून आले. यावेळी ही माहिती ऊसतोड कामगारांनी मालक विनायक लोंढे यांना सांगितली. त्यांनी तात्काळ वनकर्मचारी संपत भोर यांना घटनेची माहिती दिली.वनकर्मचारी संपत भोर व शरद जाधव हे घटनास्थळी आले. त्यांनी तीनही बछड्यांना पेठ अवसरी घाटातील वनसावित्री उद्यानात उपचारासाठी घेऊन गेले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी, वळती, शिंगवे पारगाव येथील शेतकऱ्यांची भिमाशंकर व विघ्नहर साखर कारखाण्यांची ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आली असून बिबट्यांना लपण क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे बिबटे या भागात सैरभैर झालेले दिसून येतात. शेतकऱ्यांना बिबट्यांच्या दहशतीखाली शेतीची कामे करावी लागतात. या परीसरात बिबट्यांचा वावर वाढला असुन बिबट्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या भागातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. तरी वन विभागाने जास्तीत जास्त पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. नागरिकांनी आपले व आपल्या पाळीव जनावरांचे बिबट्या पासून संरक्षण करावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे.