पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात तीन मोबाइल सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. कारागृहात मोबाइल सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी निरंजन ऊर्फ नीलेश बाळू शिंदे, महेश राजू पांचारीया या दोघांसह अन्य एका जणाविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कारागृह अधिकारी सुदर्शन खिलारे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येरवडा कारागृह रक्षकांनी कैदी नीलेश शिंदे याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या एका पिशवीत मोबाइल, बॅटरी आणि सिम कार्ड आढळून आले.
राज्यातील सर्वांत मोठे आणि बंदी संख्या अधिक असलेले कारागृह अशी ओळख येरवडा कारागृहाची ओळख असून, कारागृह परिसरामध्ये यापूर्वी देखील अनेकदा मोबाइल सापडले होते. त्यानंतर कारागृहातील सुरक्षा व्यवस्था प्रशासनाकडून कडक करण्यात आली होती. कारागृहातील संशयित रक्षकांची चौकशी करण्यात आली होती. तरीही वारंवार अशा घटना येरवडा कारागृहात घडत असल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे यावरून स्पष्ट होते.