बारामतीत कोरोनाची दुसरी लाट अधिक वाढत आहे.प्रशासन ही लाट रोखण्यासाठी जिवाचा आटापीटा करीत आहे.मात्र, काही उदासीन नागरिकांसह काही कोविड रुग्णांमुळे कोरोनाचा आलेख घसरण्याचे सध्या कोणतेही संकेत नाहीत. त्यातच रेमडेसिविरचा तुटवडा दिवसेंदिवस गडद होत आहे. मागणीच्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनाग्रस्तांची या इंजेक्शनसाठी धावाधाव सुरुच आहे.
मंगळवारी ५१८ जणांची शासकीय चाचणी केंद्रात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये इतर १८ रुग्ण बारामती व्यतिरिक्त इतर तालुक्यातील आहेत. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत ८४ जणांची आरटीपीसीआर चाचणी झाली, त्यापैकी ८४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर २३४ जणांची ॲंटीजन चाचणी करण्यात आली त्यापैकी ७४ जणांचा आहवाल पॉझिटिव्ह आला. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३३० इतके झाले. त्यामध्ये शहरातील रुग्णसंख्या १७७ तर ग्रामीण मधील रुग्णसंख्या १५३ इतकी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या १२ हजार ३७५ वर पोहचली आहे. त्यापैकी बरे झालेले रुग्णांची संख्या ९हजार ८३५ वर आहेत तर आजपर्यंत १९० जणांचा मृत्यु झाला आहे.
——————————————
चौकट
एकही रेमडेसिव्हीर इंजेक्शन आलेले नाही
रेडडेसिव्हीर आवक जावक वापर समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बुधवारी (दि १४) बारामतीत एकही रेमडेसिव्हीर इंजेक्शन आलेले नाही. मेडीकल ‘अटॅच’ असणाऱ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांची सोमवारी (दि १३) बैठक घेण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना मेडीकलची सोय असणाऱ्या रुग्णालयांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी घ्यावी. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. अन्यथा संबंधितांना प्रांत कार्यालयाकडे तक्रार करावी, असे कांबळे यांनी सांगितले.
—————————————————