पुणे: आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेच्या वेळेपूर्वी १०० पैकी ९२ प्रश्न व उत्तरे लिखित स्वरुपात पेपर फोडून ती व्हायरल केल्याप्रकरणात सायबर पोलिसांनी २० जणांविरोधात न्यायालयात ३ हजार ८१६ पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
विजय मुऱ्हाडे (वय २९), अनिल गायकवाड (वय ३१), सुरेश जगताप (वय २८), बबन मुंढे (वय ४८), संदीप भुतेकर (वय ३८), प्रकाश मिसाळ (वय ४०), उद्धव नागरगोजे (वय २६), प्रशांत बडगिरे (वय ५०), डॉ. संदीप जोगदंड (वय ३६), शाम मस्के (वय ३८), राजेंद्र सानप (वय ५१), महेश बोटले (वय ५३), नामदेव करांडे (वय ३३), उमेश मोहिते (वय २४), अजय चव्हाण (वय ३२), कृष्णा जाधव (वय ३३), अंकित चनखोरे (वय २३), संजय सानप (वय ४०), आनंद डोंगरे (वय २७), अर्जुन राजपूत (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत.
दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, भूम येथील ग्रामीण रुग्णायातील क्लार्क, आंबेजोगाई मेंटल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक आदींचा समावेश आहे.
ही कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केली.
आर्थिक व्यवहाराचा अद्याप तपास बाकी
यातील एजंटांनी डॉ. प्रशांत बडगिरे याला ३० लाख रुपये देऊन पेपर विकत घेतला होता. परीक्षा झाल्यानंतर निवड झाल्यावर ते परीक्षार्थीकडून पैसे गोळा करून काही कोटी रुपये देणार होते. या एजंटांनी परीक्षार्थींना पेपर देताना त्यांच्याकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली होती. पैसे मिळाल्यावर ती त्यांना परत करण्यात येणार होती. त्यातील काही परीक्षार्थींनी पैसे दिले होते. या एजंटांना किती पैसे मिळाले, याची चौकशी परीक्षार्थींकडे करण्याचे अद्याप बाकी आहे.